किल्ले जंजिरे मेहरुब आणी शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज
रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळील मुरुड नजीकच्या दंडाराजपुरी गावातील एका बेटावर असलेला अजिंक्य असा जंजिरा किल्ला इसवी सन १६१७ मध्ये पेरिमखान नावाच्या हबशी सरदराने राम पाटील या स्थानिक कोळी बांधवाच्या कडून दग्याने जिंकून निजामकडून परवानगी घेऊन बांधला. त्यापूर्वी तिथे मेढेकोट होता.मेढेकोट म्हणजे लाकडी दमदमे(बुरुज )व तटबंदी त्यावर कोळी लोकांचे राज्य होते.त्यातील कोल्यांच्या शेवटचा प्रमुख राम पाटलास तेलाच्या व्यापाराच्या निमित्ताने किल्ल्यात आसरा घेऊन तेलाच्या पिंपात सैन्य लपवून कैद केले व त्याचा नंतर शिरच्छेद केला पेरिमखान हेच सिद्धीचे मूळ पुरुष. हे सिद्धी मूळचे आबेसेनिया प्रांतातील अबेसेनिया चा अपभ्रउंश हबशी
पुढे जाऊन भारतीय परकीय राज्यकर्ते मुघल, निजामशाहा, आदिलशहा कुतूबशहा इ. पातशह्यांचे समुद्रावर फारसा वचक नसल्याने हा सिद्दी सार्वभौम बनला परंतु शिवाजी महाराजांनी आरामारी व जलदूर्गांचे महत्व जाणले होते. त्यामुळे सिद्धिवर वाचक बसवण्यासाठी त्यांनी केलेल्या मोहिमेचा आपण आज विस्ताराने आढावा घेणार आहोत. तसेच संभाजी राजांनी बांधलेला पूल, कोंडाजी फर्जंद ह्यांचे बलिदान ह्या गोष्टींचा आढावा घेऊन नंतर जंजिरा का अभेद्य राहिला याबाबत माझे मत मी मांडणार आहे.
▪️भाद्रपद संपण्यास काही काळ होता. पावसाने पुर्ण विश्रांती घेतली नसली तरी तो अधून मधूनच सरीवर बरसत होता. लायजी पाटलांनी जंजिऱ्याच्या सिद्दीला अरबी समुद्रात गाडण्यासाठी धाडसी योजना आखली होती. भाद्रपदातील कृष्ण पक्षातील अंधाऱ्या रात्रीचा फायदा घ्यायचा हा निश्चयच होता. बहुदा याच सात आठ दिवसात हा प्रसंग घडल्याचा अंदाज आहे.
▪️छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी जनतेमध्ये स्वाभिमानाचं स्फुल्लिंग पेटवून स्वराज्याची स्थापना केली होती. हे स्वराज्य उत्तरेत मुघल दक्षिणेकडील आदिलशाहा शिवाय पोर्तुगीज, इंग्रज अशा अनेक सत्ताधीशाच्या डोळ्यात खुपत होते. या बलाढ्य शत्रू सोबतच स्वराज्याचा आणखी शत्रू होता ज्याने पश्चिम किनारपट्टी आपल्या ताब्यात ठेवली होती. तो म्हणजे मुरुडच्या जंजिऱ्याचा सिद्दी. आफ्रिकेतुन आलेल्या हबशी जमातीच्या सिद्दीने जंजिऱ्यासारख्या अभेद्य सागरी किल्ल्याच्या जोरावर अरबी समुद्रावर वर्चस्व निर्माण केलं होतं.
▪️या समुद्रावर जर आपलं राज्य स्थापन झाल तर इंग्रजांपासून पोर्तुगीजा पर्यंत सर्व जण वठणीवर येतील हे महाराजांना ठाऊक होतं. मुघलांच्या पाठिंब्यावर सिद्दीचा उपद्रव सुद्धा वाढला होता. यासाठी जंजिऱ्याचा बंदोबस्त करावा लागणार होता. शिवरायांनी मुरुडजवळ सामराजगड बांधून सिद्धीच्या जमिनीवरील हालचालींवर नियंत्रण आणले. तर सिद्दीच्या समुद्रावरील हालचालींना जरब बसविण्यासाठी महाराजांनी मुरुडजवळ समुद्रात असलेल्या कासा बेटावर किल्ला बांधायचा निर्णय घेतला.
▪️शेकडो पाथरवट, गवंडी, लोहार कासा बेटावर पाठवण्यात आले. युद्ध पातळीवर काम सुरू होतं.
▪️हि बातमी कळल्यावर सिद्दी अस्वस्थ झाला, कारण या किल्यामुळे त्याच्या समुद्रातील हालचालींवर मर्यादा येणार होत्या. त्याने आरमार घेऊन कासा बेटावर चढाईची तयारी केली. परंतु महाराजांनी सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी दर्यासारंग दौलतखानची आधीच नेमणूक केली होती.
▪️किल्ल्यासाठी लागणारी रसद पुरविण्याचे काम प्रभावळीचे सुभेदार जिवाजी विनायक यांच्यावर सोपवण्यात आलं होत. केळशी बंदरावर दौलतखानाच्या आरमाराला ही रसद पोहचवण्याचे आदेश महाराजांनी जिवाजी सुभेदाराला दिले होते. पण जिवाजीने वेळेत रसद पुरवलीच नाही. केळशीच्या बंदरावर दौलतखान वाट पाहात राहिला. सिद्दीच्या इशाऱ्यावर सुभेदाराने हा घोटाळा केला होता. शिवरायांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा ते रागाने लालबुंद झाले. त्यांनी सुभेदाराला खरमरीत पत्र पाठवल, त्यात ते म्हणतात,
▪️“जंजिऱ्याच्या श्यामलांस जबर शह देण्यासाठी आम्ही दांडा राजपुरीसारखी दुसरी दांडाराजपुरी कांसा बेटावर उभी करू पहात आहोत. तुम्ही मात्र बेदरकार दिरंगाईने बेफिकिर वर्तता ?” महाराजांनी त्या सुभेदाराला बडतर्फ केले. किल्ल्याच बांधकाम बंद पाडण्याच सिद्दीच स्वप्न अपूर्ण राहीलं. रात्रीचा दिवस करत स्वराज्याच्या मावळ्यांनी विक्रमी वेळेत किल्ला उभारला. शिवाजी महाराज म्हणतात त्या प्रमाणे जंजिऱ्याच्या छाताडावर दुसरा जंजिरा उभा राहिला. या किल्ल्याला नाव देण्यात आलं पद्मदुर्ग. सुभानजी मोहिते यांना पद्मदुर्गाचे पहिले किल्लेदार बनवण्यात आलं.
▪️पुढे 1676 मध्ये पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांनी थेट जंजिऱ्यावर हल्ला करण्याची मोहीम आखली. त्यांनी आसपासच्या सोनकोळ्याची मदत घ्यायचं ठरवलं. त्यांचे प्रमुख होते लायजी पाटील!
▪️जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. एकेकाळी सोनकोळी पाटील या किल्ल्यावर राज्य करायचे. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र, याशिवाय तटावर असलेल्या ५७२ तोफा यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता.
▪️मोरोपंतांनी मचव्यावरील तोफांवरून या तटबंदीवर गोळाफेक करायचं ठरवलं. पण हा प्रयत्न सपशेल फसला. जंजिऱ्याच्या बलाढ्य तटबंदीला भेदता आले नाही. आता काय करायचे हा प्रश्न मोरोपंतांपुढे पडला. अशावेळी एक धाडसी कल्पना पुढे आली, जंजिऱ्याच्या तटाला शिड्या लावायची. आणि या जीवघेण्या धाडसासाठी पुढे आले ते लायजी पाटील!
▪️त्यांनी मोरोपंत पिंगळे याना सांगितलं की, “आम्ही होड्यांतून जंजिऱ्याचे तटापाशी जाऊन होड्यांत शिड्या, तटास उभ्या करतो. तुम्ही वेगीवेगी मागोमाग होड्यांतून आपले लष्कर घेऊन येणे. शिडीयांवर चढून , एल्गार करून आपण जंजिरा फत्ते करू. “ठरल्याप्रमाणे मध्यरात्री लायजींंच्या काही होड्या मध्यरात्रीच्या गडद अंधारात जंजिऱ्याच्या तटा जवळ पोहोचल्या. त्यांंच्या सोनकोळी साथीदारांनी शिड्या होडीत उभ्या करून तटाला लावल्या. राक्षसाप्रमाणे धिप्पाड हबशी रखवालदार तटावरती गस्त घालत होते. खाली मराठ्यांची चाललेली हालचाल त्यांच्या गावी देखील नव्हती. लायजी पाटील शिडी चढून तटावर लपले. दूर समुद्राकडे त्यांचं लक्ष होत. अंधारात प्रत्येक श्वासागणिक मोरोपंतांच्या येऊ घातलेल्या कुमकेची ते वाट बघत होते. पण मोरोपंत आणि त्यांचे सैन्य अजिबात आले नाही. पहाट होत आली. सकाळच्या उजेडामुळे मराठ्यांचा डाव हबश्यांच्या नजरेस पडण्याची शक्यता होती. अन् मग घातच! पुन्हा ही वाट कायमची बंद होणार होती. काळजावर दगड ठेवून लायजी पाटलांनी तटबंदीवरच्या शिड्या काढून घेतल्या आणि निराश मनाने त्या अंधारात परत पद्मदुर्गाला आले. एक मोठा आरमारी डाव फुका गेला होता. नाही तर त्याच दिवशी मराठयांनी सिद्दीला अरबी समुद्रात दफन केलं असत.
▪️लायजी पाटलांचे हे धाडस पाहून शिवाजी महाराजांनी त्यांना रायगडावर बोलवून घेतले. त्यांना पालखीचा मान दिला. पण दर्यात फिरणार्या सोनकोळ्यांना पालखीचा काय उपयोग म्हणून लाय पाटलाने नम्रपणे पालखी नाकारली. यावरून महाराज काय ते समजले. त्यांनी मोरोपंताना एक नावे गलबत बांधून त्याचे नाव “पालखी” ठेवून लाय पाटलांच्या स्वाधीन करण्यास सांगितले. याशिवाय राजांनी लाय पाटलास छत्री, वस्त्रे, निशाण, व दर्या किनारीची “सरपाटीलकी” दिली.
छत्रपती संभाजी महाराज व जंजिरा मोहीम.
शिवाजी महाराजानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराज यांनी राज्याची सुत्रे हाती घेतली. संभाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाल्यावर त्याच वर्षी त्यांनी औरंगजेबास पहिला तडाखा दिला. सम्राट औरंगजेबाचा पुत्र अकबर हा राजपुतान्याच्या दुर्गादास राठोड याच्यासह दक्षिणेत संभाजी महाराजांकडे आश्रयास आला. त्याने संभाजी महाराजांस औरंगजेबास सम्राट पदावरून हटवण्याच्या कामात मदत करावी अशी दोन पत्रे सादर केली.
याच सुमारास औरंगजेबाच्या आदेशानुसार सिद्दी मराठ्यांच्या मुलुखातल्या नागोठणे, पेण या भागात लुटालूट करत होता, इंग्रजांनी सिद्दीला मुंबई बेटावर आश्रय दिल्याने सिद्दीला नागोठणे खाडीत शिरुन परिसरात लुटालूट करणे शक्य होते हे संभाजी महाराजांचे ध्यानात आल्याने त्यांनी इंग्रजांना अद्दल शिकविण्यासाठी इंग्रजांच्या राजापूरच्या वखारीवर हल्ला चढवला, हल्ल्यामुळे घाबरून गेलेले ब्रिटिश वखारीतच अडकून पडले.
यानंतर संभाजी महाराजांनी आपले वकील आवजी पंडित यांना इंग्रजांना तंबी देण्याकरिता मुंबईस पाठवले व निरोप दिला की, यापूर्वी शिवाजी महाराजांशी झालेल्या तहाप्रमाणे मुंबईकरांनी सिद्दीचा बंदोबस्त नाही केला तर संभाजी महाराज इंग्रजांबरोबर युद्ध पुकारतील, त्यामुळे इंग्रजांनी सिद्दीला देत असलेली मदत त्वरीत थांबवावी व त्याला त्याच्या आरमारासह मुंबईबाहेर हाकलून यावे अन्यथा संभाजी महाराजांनी मुंबईवर हल्ला करण्याचा निश्चय केला आहे. याचवेळी सिद्दी आपल्या आरमारासहित सुरतला गेल्याने ब्रिटिशांना थोडे हायसे वाटले व संभाजी महाराजांचा वकील मुंबईस काही काळ राहिला व मुंबईहून पुन्हा रायगडास जाताना ब्रिटिशांनी अनेक नजराणे संभाजी महाराजांना नजर करण्यासाठी दिले. यामुळे संभाजी महाराज खुश होऊन नागोठणे मुलुखातून आपली तांदळाची गरज भागेल असे ब्रिटिशांना वाटले परंतु सिद्दीने ब्रिटिशांच्या मनोदयास परत एकदा तडाखा दिला. सिद्दीन १६ मार्च १६८१ साली नागोठणे मार्गे मुंबईस जाणारी मराठ्यांची दोन गलबते व त्यातील चार माणसे धरली, त्यामुळे चौल येथे ३००० सैन्यासह मराठा सरदार मुंबईवर हल्ला करण्याच्या तयारीत बसला होता. त्याने गलबतांची मागणी केली तेव्हा ब्रिटिशांनी संभाजी महाराजांच्या भयास्तव ती गलबते सिद्दीकडून घेऊन मराठ्यांना परत केली.
१ जून १६८१ साली अकबर नागोठण्यापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सुधागड किल्ल्याच्या पायथ्याशी दाखल झाला. संभाजी महाराजांनी त्याची राहण्याची व्यवस्था केली. पातशहा तेथे राहिल्यामुळे गावास पातशहापूर (पाच्छापूर) असे नाव पडले. या प्रकारामुळे औरंगजेब डिवचला गेला आणि त्याने ही युती मोडून काढण्याकरिता मराठ्यांच्या सैन्यापेक्षा दहा पटीने जास्त सैन्य महाराष्ट्रावर पाठविले व स्वतः बुऱ्हाणपूर येथे दाखल झाला. मोगलांच्या कारवायांना तोंड देण्याआधी संभाजी महाराजांना जंजिरेकर सिद्दीशी सामना कराया लागला.
सिद्दीने उंदेरीहून लहान लहान नौका मुंबईच्या दक्षिणेकडे नागोठणे आणि पेण खाड्यांमध्ये पाठवल्या. तेथील किनाऱ्यांवर छापा घालून रहिवाशांना गुलाम म्हणून मुंबईस पाठविले. सिद्दीचे वृत्त संभाजी महाराजांना समजताच त्यांनी दोनशे सशस्त्र सैनिक उंदेरीवर उतरवून सिद्दीच्या कृत्याचा वचपा काढला. याकाळात सिद्दी, इंग्रज व मराठे यांच्यामध्ये युद्ध झाल्याशिवाय एक वर्षही उलटत नसे. जंजिऱ्याचा सिद्दी मोगलांचा मांडलिक व मराठ्यांचा शत्रू असल्याने इंग्रजांकरवी मुंबई बेटाच्या परिसरात आश्रय घेऊन मराठी मुलखावर हल्ले करण्याचे त्याचे प्रयत्न सतत चालू असत. १६८१ साली त्याचा उपद्रव अधिक वाढू लागल्याने संभाजी महाराजांनी चार हजार सैन्य रायगडावर तयार केले आणि नागोठण्याच्या बंदरातल्या आरमारात त्यांनी आपली २२ गलबते सिद्दीवर स्वारीसाठी सिद्ध ठेवली.
१६८१ च्या सप्टेंबरमध्ये नागोठण्यातून बाहेर पडलेले संभाजी महाराजांचे आरमार व सैन्य उंदेरीजवळ जाऊन पाऊस कमी होण्याची वाट पाहात थांबले. या स्वारीचे प्रमुख महाडचे दादाजी देशपांडे होते. ही मोहीम यशस्वी झाली तर त्यांना अष्टप्रधानांमध्ये स्थान देण्याची हमी संभाजी महाराजांनी दिली होती. मात्र ही मोहीम ऐनवेळी फसली जाऊन सिद्दीने दादाजी देशपांडे यांचा महाङपर्यंत पाठलाग केला आणि दादाजी यांच्या घरावरच छापा टाकून त्यांच्या कुटुंबास कैदी बनवले. याच दरम्यान मोगलांच्या आदेशाने पोर्तुगीजांनी आणि सिद्दीने संभाजी महाराजांना युद्धात गुंतवून ठेवण्याचा कट केला, त्यामुळे संभाजी महाराज एकाच वेळी अनेक सत्तांबरोबर युद्धात गुंतल्यामुळे औरंगजेबाला दक्षिणेत भल्यामोठ्या सैन्यासह येण्यास चांगलीच संधी मिळाली.
इ.स. १६८१ च्या डिसेंबर महिन्यात सिद्दीने मराठ्यांची नागोठणे य आपटे ही गावे लुटली व जाळली, सिद्दीच्या या कृत्यामुळे संभाजी महाराजांना फार त्रास झाला आणि सिद्दीच्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी त्यांनी जंजिराच हस्तगत करण्याचे ठरवले. संभाजी महाराजांनी प्रथम कोंडाजी फर्जद यांस सिद्दीकडे पाठविले. संभाजी महाराजांवर नाराज होऊन मी आपणास सामील झालो आहे अशी खोटी माहिती देऊन कोंडाजी यांनी सिद्दीच्या गोटात प्रवेश मिळवला आणि कुटुंबासह जंजिरा किल्ल्यात राहू लागले. मात्र कालांतराने हा कट सिद्दीला कळला व त्याने कोंडाजी फर्जदसहित कुटुंबास आणि इतर माणसांस ठार केले.
कोंडाजी फर्जंद व त्यांच्या कुटुंबियांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी महाराजांनी संभाजी महाराजांनी जंजिऱ्यास वेढा घालण्याचा निश्चय केला आणि राजपुत्र अकबर आणि वीस हजार सैनिकांसह रायगडाहून जंजिऱ्यास पोहोचले, सतत १५ दिवस मराठ्यांनी जंजिऱ्यावर तोफा डागल्या. त्यामुळे जंजिरा किल्ल्याच्या भिंती तुटून पडायची पाळी आली. घाबरलेल्या सिद्दींनी आजूबाजूच्या टेकड्यांवर आश्रय घेतला. जंजिरा किल्ला जिंकण्यास काही काळाचाच अवधी असताना मोगल सरदार हसन अली खान मोठ्या सैन्यबळासह उत्तर कोकणातील कल्याण सुभ्यावर चाल करून आल्याने संभाजी महाराजांना ही मोहीम सोडून कल्याण सुभ्याकडे जावे लागले व जाताना त्यांनी कल्याण सुभ्याचे दक्षिणेकडील टोक असलेल्या नागोठणे पेण व आपटे परिसरात पंधरा हजार सैन्य तैनात ठेवले.
मोगलांच्या सांगण्यावरून सिद्दी व पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांविरुद्ध युद्ध पुकारले त्या कटासंदर्भातील एक पत्र गोव्याच्या व्हॉईसरॉयने सिद्दी याकुब याला लिहिले. त्यात त्याने असे सांगितले की, आपली दोन पत्रे मिळाली. एक पत्र २६ ऑक्टोबरचे असून ते मुंबई येथून लिहिण्यात आले आहे. हे पत्र आपले प्रतिनिधी नूर महंमद याने आणले तर दुसरे पत्र वेंगुर्ल्याच्या बंदरातून लिहिले आहे ज्या ठिकाणी आपण आपल्या आरमारासह आहात. ही दोन्ही पत्रे वाचून मला फार आनंद झाला. त्यात आमच्यावर आपला किती लोभ आहे हे दिसून येते. आपण चौलच्या छावणीत आमच्या ठाण्याच्या रक्षणासाठी सैन्य पाठविलेत व त्या सैन्याची आपल्या आरमारासाठी गरज असताना आपण ते सैन्य तिथून काढून घेतले नाहीत. कारण आमचे उत्तरेकडील सेनापती मॅन्युअल लोबुद सिल्व्हेरा यांना चौलच्या मदतीला पाठव म्हणून सांगितलेले सैन्य आले, करंजा नदीच्या पात्रात आपण काही गलबतांसह आपली नौका आमची वाट मोकळी करुन देण्यासाठी पाठवलीत, संभाजी राजे नागोठणे बंदरात शहात्तर गलबतांसह होते नागोठणे नदीच्या पात्रातील रस्ता रोखण्याचा त्यांचा हेतू होता. आपण ही उपाययोजना अनुभवी सेनापतीप्रमाणे केली, त्यातून आपली आमच्याकडील मैत्री प्रतित होते. पत्रात सांगितल्या प्रमाणे संभाजी महाराजांच्या आरमारावरील सरदार दौलतखान नागोठणे येथे लढाईच्या तयारीत असल्याचे उल्लेख आढळतात.
सिद्दीने पोर्तुगीजांशी केलेली ही छुपी युती कालांतराने दोघांच्याही अंगास आली, कारण १६८२ च्या जून-जुलैमध्ये संभाजीराजांनी रेवदंड्यास वेढा दिला , बरेच दिवस तो चालला. १६८३ मध्ये संभाजी महाराजांनी उत्तर कोकणातील दोन किल्ले जिंकले तसेच जुनी साष्टी ब बारदेस येथेही चढाई केली. संभाजी महाराजांनी रेवदंड्याचा वेढा उठवावा म्हणून पोर्तुगीजांनी फोंड्यास वेढा घातला.
१६८३ च्या डिसेंबरमध्ये मराठ्यांनी गोव्यातील अनेक गावे घेऊन फोंडा लढविला. फोंड्याच्या लढाईत येसाजी कंक व त्यांचे पुत्र कृष्णाजी कंक यांनी मोठा पराक्रम गाजवला. सिद्दीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी संभाजी महाराजांनी जंजिरा किल्ल्याभोवती एक सेतूच उभारण्याचे काम सुरु केले. यासाठी पन्नास हजार माणसे कामाला लागली. आठशे वार रुंद आणि तीस वार खोल असणारा खंदक, दगड, कापूस, गाठोडी टाकून रस्ता तयार करण्यात आला. मात्र हसन अलिखानने मराठ्यांच्या ताब्यातले कल्याण जिंकून घेतल्याने महाराजांना ही मोहीम दादाजी प्रभु देशपांडे यांच्याकडे सोपवून रायगडी यावे लागले, जंजिऱ्याला मराठा सैन्याचा वेढा असताना सिद्दीची काही जहाजे मुंबई बंदरात आली, तेव्हा महाराजांनी आपल्या खांदेरी येथील आरमाराला ती जहाजे लुटण्याचे आदेश दिले.
१६८२ ते ८५ च्या सुमारास पाच हजार सैन्य असणारी गलबते नागोठणे, आणि पेण बंदरांमध्ये सज्ज होती. संभाजी महाराजांचे आरमार १२० गलबते आणि १५ गुराबांनी सज्ज होते. मराठ्यांनी यावेळी सिद्दीची अनेक जहाजे उडवली व जबर नुकसान केले त्यामुळे याचा बदल घेण्यासाठी सिद्दीने नागोठणे व पेण या दोन खाड्यांमध्ये अचानक छापा घातला आणि अनेक रहिवाशांची नाके कापली. मुंबई बेटात सिद्दीला वारंवार आश्रय देऊन नागोठणे परिसराला धोका उत्पन्न कण्याचे काम इंग्रजांकडून संभाजी महाराजांच्या काळातही होत होते. एका बाजूला सिद्दीला आश्रय देऊन संभाजी महाराजांच्या प्रदेशावर हल्ले करण्यास प्रोत्साहन देणे व दुसऱ्या बाजूला संभाजी महाराजांसोबत तहाची मागणी करणे अशा ब्रिटिशांच्या दुतोंडी उद्योगांमुळे संभाजी महाराज ब्रिटिशांवर भडकले. एक ब्रिटीश वकील मुंबईहून रायगडला संभाजी महाराजांशी चर्चा करण्यास आला व तेथे तीन महिने राहिला. मात्र संभाजी महाराजांनी त्यास स्पष्ट शब्दात सुनावले की, तुम्ही आमचे शत्रू जंजिऱ्याचा हबशी याला मुंबईस आश्रय देता, त्याला आमच्याविरुद्ध दारुगोळा पुरविता. ही तुमची कृती शिवाजी महाराजांबरोबर अगोदर झालेल्या तहाच्या एकदम विरुद्ध आहे. तेव्हा सिद्दीला मुंबईबाहेर घालवून या व आमच्या परिसरात सैन्याची जमवाजमव करण्यास त्याला बंदी करा आणि मगच सलोख्याच्या गोष्टी करा.
अशा प्रकारे इंग्रजांची संभाजी महाराजांसोबत तहाची बोलणी चालू असताना १६८४ मध्ये मुंबई कौन्सिलचा एक वकील रायगडास येऊन गेला. त्याने संभाजी महाराजांबरोबर तहाचा दोन कलमी कार्यक्रम उरकला आणि परत जाताना नागोठण्यास येऊन मग तेथून मुंबईस परतला. या तहातील कलमांमध्ये इंग्रजांनी नागोठणे व पेण येथे वखारी उघडाव्यात आणि घाटावर माल आयात निर्यात करताना राजापूर प्रमाणे जकात कर यावा. त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याशिवाय माझ्या प्रदेशातून कोणताही माणूस गुलाम म्हणून खरेदी करु नये अथवा त्याचे धर्मांतर करू नये अशा काही अटी होत्या.
तर हा अपरिचित इतिहास वाचल्यावर आपल्याला एक प्रश्न पडतोच ना की जंजिरा अजिंक्य कसा राहिला तर याच उत्तर त्याच्या बांधकामात आहे
*जंजिरा हा किल्ला जलदुर्ग असल्याने तिथे नैसर्गिक दृष्ट्या खोल पाणी आहे ते जवळजवळ 30फूट खोल आहे अगदी ओहोटीच्या वेळी ही इतकी खोली असल्याने त्याला नैसर्गिक संरक्षण प्राप्त झाले आहे
*जंजिऱ्यावर लहानमोठ्या अश्या जवळजवळ ५७२ तोफा होत्या त्या ठेवायच्या जंग्या आजही पाहता येतात त्यातली प्रमुख तीन कलालबांगडी (कलाल म्हणजे मोठा आवाज आणी ती तोफ बांगड्यासारख्या वर्तुळकार सांगाडे जोडून बनवली आहे म्हणून बांगडी),चावरी, लांडाकासम ह्या लांब पल्ल्याच्या आजस्त्र तोफा आजही पाहता येतात ह्यामुळे तसेच जंजिऱ्याच्या प्रवेशद्वारावर उतरायला कोणतीही जागा नाही त्यामुळे पायऱ्यांवरच उतरावे लागते त्यामुळे शत्रूला सामोरे जाण्याशिवाय किल्ल्यात शिरणे केवळ अशक्य
*अजून एक महत्वपूर्ण कारण म्हणजे सिद्दी घराणे नेहमी कुणाना कुणाचे अंकित राहिले आहेत इंग्रज पोर्तुगीज मुघल निजाम ह्यांच्या समर्थनामुळे सिद्दी सतत शक्तिशाली बनले तसेच समुद्रावर वाचक निर्माण केल्याने जंजिरा अजिंक्य राहिला
मी स्वतः जंजिरा पहिल्याने तेथील वास्तव मला माहिती आहे तेथे सतत शिवरायांनाही शंभूराजांनाही हा किल्ला जिंकता आला नाही सिद्दी कसा कर्तबगार होता हेच स्थानिक गाईड व लोक सांगतात सांगतात स्थानिक तसेच पद्मदुर्गावर जायला बंदी आहे तेथे नौदलाचे अधिकार आहे वास्तवता तिथे असं काहीही नाही. त्यामुळे जंजिऱ्यावर भेट देतानाच पद्मदुर्ग ला भेट द्यावी व हा खरा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा ही माझी इच्छा आहे.
Comments
Post a Comment