शोध समाधीचा; रायगडावरील पुतळाबाईंच्या समाधीची कुत्र्याच्या समाधीद्वारे होणारी विटंबना!

छत्रपती शिवाजी महाराज व वाघ्या/ कोणत्याही प्रकारचा कुत्रा ह्यांचा कोणताही संबंध नव्हता. हे तत्कालीन प्रथम किंव्हा दुय्यम दर्जाच्या उपलब्ध साहित्य वाङमयातून दिसून येते या साहित्य वाङमयात सभासद बखर, शिवभारत, ९१ कलमी बखर, जेधे शकावली या ग्रंथाचा समावेश होतो. 
मात्र यातील सभासद बखर हि कृष्णाजी अनंत सभासद या महाराजांच्या समकालीन सल्लागाराने राजाराम राजांच्या आज्ञेने लिहिलेली व अष्टप्रधान मंडळातील वाकनीस या पदावरील दत्ताजी त्रिमल वाकनिसांच्या ९१ कलमी बखरी या समकालीन असल्याने प्रमाण मानल्या जातात यात हि कुत्र्याच्या उल्लेख नाही.परंतु राजकारण्यांच्या व ब्रिगेडी पिलावळीच्या नादाला लागून  त्या पवित्र जागी कुत्र्याची समाधी बसवण कितपत योग्य आहे? आज आपण पुतळाबाईंच्या समाधीच हि त्या वाघ्या कुत्र्याची समाधी असल्याचे ऐतिहासिक पुराव्यांचा आधार घेऊन सिद्ध करणार आहोत  
सर्वप्रथम काही ऐतिहासिक कागदपत्रातील शिवरायांच्या निधनाविषयीचे उल्लेख आपण पाहूया 
१. सभासद बखर:-
       शिवरायांच्या काळात सल्लागार पदावर(सभासद) कार्यरत असणाऱ्या कृष्णाजी अनंत सभासद ह्यांना छत्रपती राजाराम राजांनी शिवचरित्र लिहिण्याची आज्ञा केली रामराजे म्हणतात "आपण जुनी जाणती माहितीगार लोक त्याप्रमाणे स्वामींचे(शिवछत्रपती)संपूर्ण चरित्र इक्तेबार(आरंभा) पासून लिहिणे सभासद  शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक घटनांचा साक्षीदार असल्याने हि बखर प्रमाण मानली जाते यातील उल्लेख असा 
    , “मग काही दिवसांनी राजास ज्वराची व्यथा जाहाली.राजा पुण्यश्लोक.कालज्ञान जाणे.विचार पाहाता आयुष्याची मर्यादा झाली.असें कळून जवळील कारकून व हुजरे लोक होते त्यामध्ये सभ्य,भले लोक बोलावून आणिले.”

सभासद पुढे कुणा कुणाला बोलावले त्या माणसांची नावे सुद्धा देतो. ” बितपशील- कारकून - निळोपंत प्रधानपुत्र, प्रल्हादपंत, गंगाधरपंत हे जनार्दनपंताचे पुत्र, रामचंद्र निळकंठ, रावजी सोमनाथ, आबाजी महादेव, जोतीराव, बाळप्रभू चिटणिस हुजरे लोक - हिरोजी फरजंद, बाबाजी घाडगे, बाजी कदम, मुधोजी सरखवास, सुर्याजी मालुसरा, महादजी नाईक पानसंबळ.” या सर्व जाणत्या माणसांना राजांनी काही उपदेश केला, “त्यास सांगितले की आपली आयुष्याची अवधी जाली. आपण कैलासास श्रीचे दर्शनास जाणार. शरीर क्षीण देखून पन्हाळियावरि संभाजी राजे वडील पुत्र यांस सांगितले होते की 'तुम्ही दोघे पुत्र आपणास यांस राज्य वाटून देतो. आणि उभयता सुखरूप राहणे. म्हणोन सांगितले. परंतु वडील पुत्र संभाजी राजे यांनी ऐकिले नाही. शेवट आपला तो निदानसमय दिसताहे.” राजांचे अंत्यसंस्कार हे पुढे राजाराम महाराजांनी केले असा उल्लेख सभासद करतो.
 २. दत्ताजी त्रिमल वाकनीस ह्यांची ९१ कलमी बखर 
        शिवरायांच्या मंत्रिमंडळात वाकनीस या पदावरील दत्ताजी त्रिमल वाकनीस ह्यांच्या मूळ 91 कलमी बखरीतील उल्लेख असा आहे “नंतर राजे स्वामीस नवज्वर प्राप्त झाला. शके १६०२ रुद्र नाम संवत्सरे चैत्र शुद्ध १५ दोन प्रहरा, राजेस्वमी कैलासवासी झाले. सावधपणे संस्कार करून हरिदास कीर्तन करीत असता देह ठेवला.”
३.जेधे शकावली 
      जेधे शकावली ही कान्होजी नाईक जेधे यांच्या वंशजांकडून मिळवून छापण्यात आली. एक विश्वासाचे साधन म्हणून ही शकावली मानली जाते. त्यात लिहिले आहे,

“शके १६०२ रौद्र संवछर चैत्र शुध पौर्णिमा शनवारी दोप्रहरां दिवसां रायगडी सिवाजी राजे यांनी देह ठेविला”
४. शिवभारत 
     शिवरायांच्या पदरी असलेले कवी परमानंद ह्यांनी लिहिलेला काव्यात्मक संस्कृत ग्रंथ म्हणजे शिवभारत; परंतु ह्या संस्कृत ग्रंथाच्या उपलब्ध प्रतीं मध्ये इसवी सन १६६१ पर्यंतचेच उल्लेख आहेत.परमानंद हे अनेक महत्वाच्या घटनांचे साक्षीदार आहेत त्यात अग्रा भेट, अफझलखान वध इ. घटनांचा समावेश होतो परंतु हात राज्याभिषेक व त्यानंतरच्या घटनांचा उल्लेख नाही त्यामुळे शिवभारत हा अपूर्ण तरीही प्रमाण मानला जाणारा काव्यग्रंथ आहे.
 अश्याप्रकारे वरील साधनांचा अभ्यास केला असता त्यात कोठेही राजांच्या श्वान /इतर पाळीव प्राण्याने महाराजांसोबत त्यांच्या चितेवार उडी मारल्याचा साधा उल्लेख हि नाही. महत्वाच्या सभासद  बखरिसारख्या महत्वाच्या प्रमाण मानल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनातही तसा उल्लेख नाही.मग हा कुत्रा इथे आला कुठून?
जेम्स डग्लस जेव्हा रायगडा वर आला  तेव्हा त्याने रायगडावर एका मंदीराच्या समोर एक अष्टकोनी चौथरा असल्याची व हीच सेवाजीस टोम्ब अर्थात शिवसमाधी असल्याची नोंद केली व तसें स्केच बनवले मात्र त्यासोबतच बाजूलाच एक चौथरा असल्याची नोंद केली तो राजघराण्यातील व्यक्तीचा असावा असे नमूद केले;मात्र त्याची व त्या मंदिराची अवस्था बिकट असून चारही बाजूने झाडी माजली आहे.  तेथील लोकांची ते दुरुस्तीबाबतीची अनास्था त्याने आपल्या अ बुक ऑफ बॉम्बे 
या पुस्तकात व्यक्त केली आहे.
तसेच रायगडावर जी सतीशीला शिरकाई मंदिराच्या मागे आहे ती रायगडवर संभाजी राजांच्या काळात सती गेलेल्या पुतळाबाई राणी सरकारांचीच आहे याबत दुमत नाही. तसेच डग्लस ने आपल्या पुस्तकात ज्या चौथऱ्याची शिवसमाधीच्या बाजूला असल्याची व तो चौथरा म्हणजे राजघराण्यातील व्यक्तीची समाधी असल्याची नोंद केली ह्यावरून तो चौथरा हि पुतळाबाईंचीच समाधी असल्याचे लक्षात येते कारण शिवरायांच्या बाजूला कुत्र्यापेक्षा आवडती राणी पुतळाबाईंचीच समाधी असु शकते यात दुमत नाही  तसेच सभासद बखरीत पुतळाबाई संभाजी राजांच्या काळात सती गेल्याचा उल्लेख आहे पण पाळीव श्वानाचा नाही.
 किल्ले रायगडवरील शिरकाई मंदिराच्या मागील बाजूस असलेली सतीशीला.
      वाघ्या कुत्र्याचा पहिला उल्लेख शिवाजी महाराजांच्या निधनाच्या साधारण २५० वर्षानंतर लेखक चि. ग. गोगटे यांच्या महाराष्ट्र देशातील किल्ले यया पुस्तकात येतो तो असा 
 "महाराजांचा अंत झाल्यावर त्यांचे प्रेत पालखीत घालून दहानभूमीवर आणले गेले तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचा पाळीव श्वान हि होता मात्र अंत्यविधी झाल्यावर रिकामी पालखी पाहून त्या स्वामीनिष्ठ श्वानाने धावत जाऊन राजांच्या चितेवर उडी घेतली व स्वतःला जाळून घेतले ".
येथे एका गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते सभासद बखरिनुसार राजांचे अंतिमसंस्कार राजाराम राजांनी केले.त्यामुळे तेथे राजाराम राजे उपस्थित होते पण जर हि घटना खरी मानली तर सभासदाने एव्हड्या स्वामीनिष्ठ श्वानाचा उल्लेख टाळला असेल तर रामराजांनी त्याची हि चूक अमान्य केली असती व सभासद बखरीत तसा उल्लेख केला असता तसेच संभाजी राजांनीही त्या श्वानाचा यथोचित सन्मान केला असता त्याची निश्चित समाधी बांधली असती.मात्र असे काहीच घडले नाही ह्याचा अर्थ ती एक दंतकथा आहे हे दिसून येते.
आता ह्याला आधार म्हणून काही लोक तुकोजी होळकरांचा संदर्भ देतात असं म्हणतात की १९२६ च्या आसपास रायगड स्मारक मंडळ होळकरांकडे शिवसमाधीच्या जीर्णोदधारासाठी निधी मागायला गेले होते.मात्र तेव्हा त्यांच्या एका लाडक्या श्वानाचे निधन झाले होते.त्यामुळे तसेच इंग्रजांच्या भीतीने त्यांनी आम्हाला सुतक आहे त्यामुळे निधी देऊ शकत नाही असे सांगितले मात्र तेव्हा रायगड स्मारक मंडळाने तुमच्या कुत्र्याचे स्मारक  बंधू त्यासाठी निधी द्या असे सुचवल्यावर होळकरांनी निधी दिला मात्र हा हि मत प्रवाह चुकीचा आहे. कारण १९२७ च्या आसपास शिवसमाधीच्या जीर्णोदधाराचे काम पूर्ण झाले त्यासाठी रायगड स्मारक मंडळ,कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज, बडोदा संस्थानाचे महाराजा सयाजीराव गायकवाड, इंदूरचे तुकोजीराव व ब्रिटिश पुरातत्व विभागाने मदत केली.
यात ब्रिटिश पुरातत्व विभाग सामील असल्याने तुकोजी होळकरांनी इंग्रज सरकारच्या भीतीने आपल्या श्वानाच्या स्मारकाच्या बदल्यात शिवसमाधीच्या जीर्णोदधारासाठी साठी निधी दिला हि बाब येथे खोटी ठरते.
 त्यानंतर दक्षिण दिग्विजया दरम्यान कर्नाटकतील एक गढी महाराजांनी जिंकून घेतली व त्या गढीच्या राणीला ती गढी भाऊबीज म्हणून तिच्या चोळीबांगडीसाठी दिली तेव्हा तिने शिवरायांचे शिल्प कोरले त्यात एक कुत्रा आहे त्यामुळेही या गोष्टीचे समर्थन करतात मात्र समकालीन मराठा ऐतिहासिक साधनात तसा उल्लेख नसल्याने ती बाबहि चुकीची ठरते हा कुत्रा राजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत कुठून तरी आला असावा. १९०५ पूर्वी वाघ्या कुत्रा हि दंतकथा होती मात्र शिवसमाधीच्या जीर्णोदधाराच्या दहा वर्षांनंतर १९३६साली आताचे हे स्मारक उभारण्यात आले ते हि राम गणेश गडकरिंच्या राजसान्यास या नाटकावरून त्याचे वाघ्या हे नावही पडले. 
मात्र पुतळाबाईंच्या समाधीवर तो कुत्रा बसवून त्या महान राणीचा तसेच एका सतीचा आपण अपमान करतोय हे सर्वांनी लक्षात घेऊन ती चूक दुरुस्त करण्याची वेळ आली आहे.ह्यात ब्राम्हणद्वेष, जातपात राजकारण न करता किंबहुना त्याला बळी न पडता सत्य स्वीकारून पुतळाबाईंना योग्य न्याय द्यायला हवा हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
माहिती संकलन:- हितेश चव्हाण©
सदर ब्लॉग माझ्या नावाचे श्रेय न देता कोठेही अपलोड  किंव्हा शेअर केल्यास योग्य ती कारवाई कॉपीराईट कायद्या अंतर्गत केली जाईल 

Comments

Popular posts from this blog

नजरेपल्याडचा रायरी; दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड एका वेगळ्या नजरेतून भाग पहिला

ज्यूलिएस सीझर ते पोप ग्रेगोरी १३ आपण वापरत असलेल्या इंग्रजी कालगणनेचा ज्यूलीयन ते ग्रेगोरियन पर्यंतचा प्रवास.

दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड होण्यापूर्वीचा किल्ले रायरी