गधेगळ इतिहासातील एक काळी बाजू

नमस्कार मंडळी माझ नाव हितेश आजच्या या लेखात आपण एका अश्या शिलालेखाच्या प्रकाराबद्दल जाणून घेणार आहोत ज्याला इतिहासाची काळी बाजू म्हणून ओळखले जात. हा लेख लिहिण्याचे कारण म्हणजे अश्याच प्रकारची अभिशाप शिळा माझ्या गावात आहे जिला स्थानिक लोक गडदु असं म्हणतात. हा लेख लिहिण्याची प्रेरणा मला आमच्या गावातील इतिहास अभ्यासक श्री चैतन्यजी सरदेशपांडे ह्यांच्या फेसबुक पोस्ट वरून मिळाली तसेच हि शिळा मी माझ्या शैक्षणिक जीवनात तसेच आजही अनेकदा पाहत असल्याने त्या शिळेबद्दल कुतूहल होतेच पण जेव्हा त्याबद्दल अधिक माहिती घेतली तेव्हा ती गधेगळ असल्याचे लक्षात आले. तर आजच्या या लेखात आपण गधेगळ या प्रकारबद्दल खालील मुद्द्यांवरून जाणून घेणार आहोत.सदर माहिती अंतरजालावरील विविध स्रोतांमधून संकलित केलेली आहे.
*गधेगळ कोरण्यामागील उद्देश, तिचे प्रकार व पूर्वेतिहास.
*गधेगळीचे स्वरूप 
*माझ्या गावातील गडदु/गधेगळी बद्दल माहिती.

* गधेगळ कोरण्यामागील उद्देश, तिचे प्रकार व पूर्वेतिहास-
 गधेगळं कोरण्याची सुरुवात शिलाहार काळापासून झाली पुढे या प्रकारच्या शिळा यादव, चालुक्य, कादंब, विजयनगरचे संगम घराणे(हरिहर दुसरा), ते बहमणी अश्या राजवाटिंच्या काळात या कोरल्या गेल्या.
गधेगळ हे नाव त्या शिळेवरील गाढवं व स्त्रीच्या संकर करताना कोरलेल्या शिल्पावरून पडले आहे  गधे म्हणजे गाढवं आणी गळ म्हणजे शिळा.  ह्या शिळा पूर्वीच्या काळी एका राजाने मंदिराला किंवा व्यक्तीला एखादा भूप्रदेश दान दिला तर त्या दानाचा गैरवापर,अवमान होऊ नये म्हणून त्या शिळेवर एक शिवी कोरलेली असे 
ह्या शिळा आयताकृती असत त्यावर सर्वात वरती चंद्र सूर्य त्याखाली राजज्ञा व शिवी आणी सर्वात शेवटी गाढवाचे स्त्री बरोबर संकर करतानाचे शिल्प कोरलेले असे.महाराष्ट्रातील पहिली ज्ञात गधेगळ अलिबाग मधील अक्षी या गावात शिलाहार राजा पेशीदेव पहिले यांनी इसवी सण ९३४-१०१२या काळात उभारल्याचे आढळून येते.
साखरपा कोंडगाव सीमेवरील देवडे फाट्यावर असणारी पूर्वाभिमुख गधेगळ
गोव्यातील वेळूस येथे सापडलेल्या गधेगळीचे शं.गो.तुळपुळे यांनी वाचन केले त्यातील ओळ क्र. १२,१३,१४ ह्या ओळी नीट वाचल्या असता गधेगळीचे स्वरूप व महत्व लक्षात येते.
या ओळी पुढील प्रमाणे धक देवासि सर्वबाधापरिहारार्य करून आचंद्रार्क परियंत सासन करून ग्रासू दिधला हे सासन लेपि ते असि गोहत्या ब्रम्ह हत्या बाळहत्या पडे तयेची माऐसी गाडौ घोडू.
 याचा अर्थ पुढीलप्रमाणे देवावरील सर्व बाधा दूर करून चंद्रसूर्य असे पर्यंत शासन करून दान कायम ठेवणे या काळात गोहत्या,ब्राम्हणहत्या,बाळहत्या करणाऱ्याच्या मायेस गाढवं व घोडा लागो.
आता गाढवा बरोबर सामागम करताना महिलाच का तर त्या काळात महिला ह्या देवीचं रूप असल्या तरी त्यांचे समाजात स्थान हे चूल व मूल इतकंच होत त्यामुळे हि आज्ञा मोडली तर  त्याच्या घरातील स्त्री ला सर्वांसमोर गाढवाशी सामागम करावा लागेल पर्यायाने त्या पुरुषाची अब्रू जाईल म्हणून या आज्ञेच उल्लंघन कोण करत नसे. म्हणून ते शिल्प कोरलेलं असे. गधेगळीचे ३ प्रकार पडतात
*फक्त शिल्प कोरलेली.
*फक्त लेख कोरलेली.
*शिल्प व लेख कोरलेली.
*गधेगळीचे स्वरूप -
 गधेगळं हि आयताकृती असते तिची मागील बाजू मोकळीच असते समोरील बाजूस सर्वात वर चंद्रसूर्य त्याखाली राजज्ञा व शिवीचा मजकूर आणी सर्वात शेवटी गाढवाचे स्त्री बरोबर संकर करतानाचे शिल्प कोरलेले असे.
गधेगळ या इसवी सन १०वे ते १६व्या शतकात महाराष्ट्र,गोवा,गुजरात,बिहार या राज्यात आढळून आल्या. एकट्या महाराष्ट्रात सुमारे १५० च्या आसपास गधेगळ सापडल्या आहेत.
*माझ्या गावातील गडदु/गधेगळी बद्दल माहिती-
कोल्हापुराहून येताना आंबा घाट उतरून आल्यावर, आपल्या कोंडगाव - साखरप्यात, बस स्थानकाच्या अलीकडे डाव्या बाजूला, देवडे रस्त्याच्या फाट्यावर एक सुमारे 'चार फूट उंच व पावणेदोन फूट रुंद' शिळा आढळून येते. यापैकी साधारण एक फूटभर शिळा जमिनीत गाढलेली असून या शिळेचा माथा त्रिकोणी आहे. तिला स्थानिक लोक गडदु म्हणतात. मात्र हि शिळा गधेगळ आहे हे आपल्याला त्यावर कोरलेल्या चंद्र सूर्य व समागम शिल्पावरून लक्षात येते.
इतिहासाचार्य 'कै. वि.का. राजवाडे' यांनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी या शिळेवरील लेखाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता.'इतिहासाचार्य वि.का. राजवाडे संशोधन मंडळ, धुळे' या मंडळातर्फे प्रकाशित झालेल्या 'समग्र राजवाडे साहित्य खंड - ४' या पुस्तकात याबाबतचा उल्लेख आढळतो. 
राजवाडे यांनी, त्या पुस्तकात 'त्या गावाच्या इभ्रामपूर पेठेत ही शिळा आहे' असं म्हटलंय, 'या शिळेला तत्रस्थ लोक 'गाढवाची तलख' असं म्हणतात, असेही म्हटले आहे. परंतु ही शिळा प्रचंड खडबडीत असल्याने त्यावरील अक्षरे वाचण्यास खूप कठीण गेली, असेदेखील त्यांनी म्हटले आहे.तरी त्यांनी मोठ्या मेहनतीने - अंदाजने लेखणी फिरवून या शिळेवर कोरलेल्या एकूण चार ओळींचा उतारा त्यावेळी लिहुन घेतला होता. तो खालीलप्रमाणे: 
 
ओळ अक्षरे
१ श्रीमात्रागम
२ नीपुत्री
३ क माक
४ चूत

तरी त्यांना वरील चार ओळींवरून त्या लेखाच्या अर्थाचा, काहीही बोध झाला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
  मात्र महाराष्ट्र टाइम्स च्या ४ जुलै २०२१ संकेतस्थळावरील  कर्णेश्वर मंदिरावरील लेखात  सह्याद्री खंडातील श्लोकांवर आधारित श्रीकरण सुधानिधी ग्रंथावरून शेषकवीने संकलित केलेल्या संगमेश्वर महात्म्य या संस्कृत पोथीमध्ये चालुक्य राजा कर्णदेव दुसरा याने  या मंदिराच्या धर्मकार्यार्थ धर्मपूर (म्हणजे आत्ताचे धामापूर), सुपारीसाठी गुणवल्लिका, तुपासाठी शिवणी, यज्ञासाठी लवल (म्हणजे लोवले), फळांसाठी पनसगाव, उत्सवासाठी धमनी (आजचे धामणी), धर्मसेवकांच्या राहण्यासाठी कदंब-आम्रपाली ही गावे नेमून दिल्याचे म्हंटले आहे. तसेच कर्णेश्वर मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वारावर सुद्धा गधेगळ असल्याने तसेच मंदिर प्रशासनाच्या मते हे मंदिर पांडवानी एका रात्रीत बांधले व पुढे शिलाहार काळात त्याचा जीर्णोद्धार झाल्याचे म्हंटले आहे.  शिलाहार व चालुक्य या दोन्ही काळात कोकणात गधेगळी कोरल्या गेल्याचे लक्षात येते त्यामुळे साखरप्यातील गडदु हा शिलाहार/चालुक्य कालीन असावा असा माझा अंदाज आहे अर्थात त्यावरील लेख हा झीजला आहे व त्याचे वाचन करणे अजून तरी कुणाला शक्य  झाले नाही. त्यामुळे त्याचा कालखंड व माहिती याबाबत निश्चित सांगता येत नाही पण हा ऐतिहासिक वारसा पुढच्या पिढी पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तरुण पिढीची आहे.
 माहिती संकलक- हितेश चव्हाण 
 *संदर्भ व साभार-
 सदर लेखाबद्दल कोणतीही तक्रार किंव्हा आक्षेप तसेच काही बदल सुचवायचे असल्यास खालील अंतरजालीय माध्यमावर मेल करावा.
संपर्क- my gmail
२५-१२-२०२५©copyrighted content 
कॉपीराईट सामग्री प्रस्तुत सामग्रीचे सर्व हक्क संकलक/कवी/लेखक म्हणून हितेश चव्हाण यांच्याकडे आहेत तरी लेखकाच्या/संकलकाच्या/कवीच्या नावाशिवाय 
सदर पोस्ट कोणत्याही समाज माध्यमावर प्रकाशित करणे हा गुन्हा आहे.
IT IS STRICTLY PROHIBITED TO SHARE THIS POST WITHOUT INCLUDING NAME OF WRITER OF THIS POST ON ANY SITE, SOCIAL MEDIA OR ANY PLATFORM

Comments

Popular posts from this blog

नजरेपल्याडचा रायरी; दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड एका वेगळ्या नजरेतून भाग पहिला

ज्यूलिएस सीझर ते पोप ग्रेगोरी १३ आपण वापरत असलेल्या इंग्रजी कालगणनेचा ज्यूलीयन ते ग्रेगोरियन पर्यंतचा प्रवास.

दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगड होण्यापूर्वीचा किल्ले रायरी